Ad will apear here
Next
‘वैराऐवजी स्नेहाचा, सलोख्याचा मार्ग पुढे नेईल’
१२व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन


पुणे : ‘दोन समाज जोडले जाणारे उपक्रम म्हणून हे  साहित्य संमेलन आहे. भारतीय समाज संमिश्र स्वरूपाचा आहे. हिंदू-मुस्लीम समाजामध्ये हजार वर्षांचा संपर्क आहे. कटुता, युद्ध, संघर्ष, वादळेदेखील आहेत आणि स्नेह, मैत्री, जिव्हाळाही आहे. भूतकाळातून काय घ्यायचे, भावी पिढ्यांना काय वारसा द्यायचे, हे ठरवणे ही आपली आणि साहित्यिकांची जबाबदारी आहे; पण एकमेकांना समजून घेण्यात हिंदू-मुस्लीम समाज कमी पडले. धर्माधर्मांत, जाती-जातीत दुरावा निर्माण होत आहे, ही चिंतेची बाब आहे. वैराऐवजी स्नेहाचा, सलोख्याचा मार्ग भावी पिढ्यांना फुलवेल. या मार्गानेच पुढे जावे लागेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. साळुंखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे संमेलन चार ते सहा जानेवारी २०१९ या कालावधीत आझम कॅम्पस येथे सुरू आहे.

या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, संमेलनाध्यक्ष डॉ. अलीम वकील, स्वागताध्यक्ष आणि ‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, डॉ. विश्वनाथ कराड, महापौर मुक्ता टिळक, डॉ. शेख इक्बाल मिन्ने, विलास सोनवणे, डॉ. एस. एन. पठाण, निवृत्त व्हाइस अॅडमिरल निजाम नदाफ, प्रा. फ. म. शहाजिंदे, आबेदा इनामदार, लतीफ मगदूम, सय्यदभाई, डॉ. सलीम चिश्ती, अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.  

डॉ. साळुंखे म्हणाले, ‘आपण सर्वजण समान दर्जाचे भारतीय नागरिक आहोत. कोणी उच्च-नीच, इथला-परका नाही, प्रमुख-दुय्यम नाही. कोणाच्याही देशावरील निष्ठेचे प्रमाणपत्र मागण्या-देण्याचा नैतिक, संवैधानिक अधिकार नाही. ही भावना देशात असणे गरजेचे आहे. कोणीही राष्ट्र विघातक काम करीत असेल, तर त्याला रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. एखाद्या व्यक्तीच्या कृत्यावरून सर्व समाजाला संशयाच्या घेऱ्यात धरता येणार नाही. हजार वर्षांचा संपर्क असूनही, आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, ही खंत आहे. एकमेकांचे ग्रंथ, साहित्य समजून घेतले नाही.’

‘‘अल्ला हो अकबर’, ‘हर हर महादेव’ याचा अर्थ ईश्वर श्रेष्ठ इतकाच आहे; पण या घोषणा ऐकल्या की संशय, द्वेष उगीचच निर्माण होतो. हे संवादाअभावी होते. उर्दू ही भारतीय भाषा आहे, तरीही विरोध केला जातो. पेहराव, अन्नाच्या सवयींची देवाणघेवाण झालेली आहे. एकमेकांच्या साहित्याचा, धर्मग्रंथांचा अभ्यास करणारे पंडित दोन्ही समाजात घडावेत. मुस्लीम समाज मागास आहे म्हणून, जांच्याकडे कर्तृत्व, प्रतिभा आहे त्यांनी मुस्लीम समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणे, ही साहित्यिकांची जबाबदारी आहे,’ असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

सुफी साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. अलीम वकील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून, संमेलन स्थळाला प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर साहित्यनगरी नाव देण्यात आले आहे. या संमेलनात डॉ. विश्वनाथ कराड यांना ‘डॉ. अबुल कलाम आझाद सद्भावना पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. जुल्फी शेख, डॉ. मुहम्मद आझम, आबेदा इनामदार, विलास सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. साहित्य संमेलनाच्या ‘काफिला’ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी पालकमंत्री बापट म्हणाले, ‘संघटितपणे समाजात संदेश देण्यासाठी, मानव धर्माला उपयोगी काम या संमेलनातून होत आहे, ही चांगली बाब आहे. समाजातील वाईट गोष्टी उघडकीस आणि सकारात्मक गोष्टी पुढे आणण्याचे काम संमेलनाने करावे. राजकारण्यांनी सर्व व्यासपीठांवर लूडबूड करू नये, असे मला वाटते. राजकारण्याचे पद एक दिवस जाणार असते, पण साहित्यिकांचे पद अजरामर असते. आज मी हार, फुले घेऊन न जाता पुस्तके घेऊन जाणार आहे. त्यातूनच आमच्या वागण्यात, कामात बदल होणार आहे.’

डॉ. इनामदार म्हणाले, ‘प्रस्थापित साहित्यिकांनी नवोदित तरुणांना वाव द्यावा. नव्या तंत्र स्नेही तरुणांनी कालसुसंगत विचार आधुनिक माध्यमातून मांडावेत. साहित्य हे मानवी संस्कृतीचे प्रकटीकरण असल्याने त्यातून मने जोडण्याचे काम व्हावे. दुसऱ्यांदा आझम कॅम्पसमध्ये या संमेलनाचे आयोजन करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद होत आहे.’

संमेलनाध्यक्ष डॉ. वकील म्हणाले, ‘‘चला संभ्रमित होऊया’ अशा प्रकारचा काळ आहे. २०१४ पूर्वीचा असाच इतिहास पंतप्रधान मोदींनी सांगितला; पण इतिहास डस्टरने पुसता येणार नाही. भाजप, संघ परिवाराचे स्वातंत्र्य चळवळीतील एकाही महानायकाशी गोत्र जुळत नाही. काँग्रेसमुक्त भारताबरोबर त्यांना मुस्लीममुक्त भारत करायचा आहे. संभ्रमित करणाऱ्या या काळाचा सामना केला पाहिजे.’

‘स्थानिक भाषांमध्ये आदान प्रदान महत्त्वाचे आहे. मुस्लीम मराठी साहित्य सर्वांपर्यंत पोहोचवून मानवतावादी कार्य करण्यास या संमेलनाचा उपयोग होईल,’ असे महापौर टिळक म्हणाल्या आणि संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना डॉ. कराड म्हणाले, ‘या सद्भावना पुरस्काराने आंतरिक समाधान मिळाले. सर्व धर्मग्रंथ हे जीवन ग्रंथ आहेत. त्यात भेद नाहीत. मानवनिर्मित भेद कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’

या प्रसंगी डॉ. मिन्ने यांनी मनोगत व्यक्त केले. लतीफ मगदूम यांनी आभार मानले. दम्यान दुपारी अडीच वाजता ‘महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि मुस्लिम मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद झाला. यात डॉ. मुहम्मद आझम, डॉ.  आनंद काटीकर, डॉ. प्रतिमा इंगोले, गुलाम ताहेर शेख, डॉ.  रज्जाक कासार आदी सहभागी झाले होते. त्यानंतर आयोजित ‘राष्ट्रवाद कोणाची मिरासदारी’ या परिसंवादात डॉ.  कुमार सप्तर्षी, डॉ. अब्दुल कादर मुकादम, प्रा. जावेद कुरेशी, प्रा. रहमतुल्ला कादरी, डॉ. भालचंद्र कांगो, श्रीमंत कोकाटे, साहिल शेख सहभागी झाले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZXMBW
Similar Posts
डॉ. आ. ह. साळुंखे करणार मुस्लिम साहित्य संमेलनाचे उद्घाटन पुणे : ‘मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे १२ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन चार ते सहा जानेवारी २०१९ या कालावधीत दरम्यान पुणे येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे
पुण्यात होणार १२ वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पुणे : मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे मुस्लीम मराठी साहित्य चळवळीचे १२ वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन चार ते सहा जानेवारी २०१९ दरम्यान पुणे येथे होणार असून, संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांची निवड करण्यात आली आहे
‘नव लेखनाचा प्रवास वैचारिक बैठकीकडे व्हावा’ पुणे : ‘प्रतिक्रियात्मक लेखनाकडून वैचारिक बैठकीकडे नव लेखनाचा प्रवास व्हावा,’ असा सूर अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील ‘सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा’ या विषयावर आयोजित परिसंवादात उमटला.
‘मराठी तरुणाईला वैचारिक वाङ्मय आवडते’ पुणे : ‘तरुणपिढी सोशल मीडियात गुरफटत असून, वाचनसंस्कृती लोप पावत आहे, असे म्हणणे अयोग्य आहे. तरुणांमध्ये ज्ञानाची भूक मोठी आहे. ही भूक इंटरनेट भागवू शकत नाही. मराठी तरुणाईला वैचारिक वाङ्मय वाचायला आवडते. तसे सकस साहित्य उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. आ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language